सांगली - संपूर्ण देशभरात गणेशाच्या आगमनाला काही अवधी बाकी असला तर सांगलीमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. चोर गणपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गणेशाची गणपती संस्थानाच्या गणेश मंदिरात प्रतिष्ठापना झाली आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला चोर गणपतीची प्रतिष्ठापणा करण्याची परंपरा आजही मोठ्या भक्तीने जोपासण्यात येत आहे.
कोणताही गाजावाजा न करता पहाटे पूजाअर्चा करून ही प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची पाऊणे दोनशे वर्ष जुनी परंपरा आहे. सांगली संस्थानचे राजे पटवर्धन यांनी गणेशउत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु केली होती. सांगलीचे आराध्य दैवत म्हणून या गणरायाची ओळख आहे.
संपूर्ण सांगलीकरांची या गणेशावर मोठी श्रद्धा आहे. सांगली गणपती पंचायतनतर्फे दरवर्षी हा आगळावेगळा गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते. म्हणून, याला चोर गणपती असे संबोधले जाते. चोर गणपतीचे विसर्जन होत नाही. या चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली जाते. दीड दिवसानंतर चोर गणपती सुखरूप ठिकाणी हलवण्यात येतात.