सांगली - पोलीस असणाऱ्या आत्येभावानेच आपल्या सख्ख्या मामाच्या मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आणून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये हा अपहरणाचा प्रकार घडला होता. इस्लामपूर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात छडा लावत चिमुरड्याची सुखरूप सुटका केली आहे.
सांगलीच्या इस्लामपूर येथून मंगळवारी वरद बाळासाहेब खामकर या १० वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे क्लासला जाताना अपहरण झाले होते. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. या अपहरणाचा छडा लावत मुलाची सुखरूप सुटका करण्याचे मोठे आव्हान इस्लामपूर पोलिसांसमोर होते. इस्लामपूर पोलिसांनी गतीने तपास करत अपहरण झालेल्या वरदचा शोध लावला. कोल्हापूरच्या शिये फाटा येथील एका लॉजवर छापा टाकत वरदची सुखरूप सुटका केली आहे.
यावेळी सुनील कदम, गोपाल गडदाकी, विलास वरई अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे अटकेतील सुनील कदम हा वरदच्या वडिलांचा सख्खा भाचा असून वरद हा त्याचा आत्येभाऊ आहे. तर सुनील कदम हा पोलीस कर्मचारी असून सध्या तो गडहिंग्लज पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पथकांनी या अपहरणाचा तपास करत अवघ्या एका दिवसात छडा लावत, मुलाची सुखरूप सुटका करत तिघांना बेड्या ठोकल्या. आरोपी पोलीस सुनील कदम हा कर्जबाजारी होता. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.