सांगली - पवारांनी मला शिकवू नये, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना सुनावले आहे. राज्य सरकारची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे अशी आहे, तसेच केंद्राच्या पैश्यातून राज्य सरकार बंगले बांधत असून हे सगळे येत्या अधिवेशनात बाहेर काढू, असा इशाराही पाटील यांनी दिला. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवारांनी मला शिकवू नये -
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुण्यात चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला होता. 'ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्या बद्दल मी काय भाष्य करू' असे त्यांनी म्हटले होते. यावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार पलटवार केला आहे. पवारांना माढा लाढावे लागले, पण जिंकणार नाही असे समजताच, माढा सोडावे लागले. त्यामुळे पवारांनी मला शिकवू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
राज्याची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे -
केंद्राच्या अर्थसंकल्पाबाबत आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्राने घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. केंद्र सरकारने आरोग्य आणि कृषीवर अधिक भर दिला आहे. तसेच केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीत अधिकची तरतूद केली आहे. मात्र, राज्य सरकारचे अवस्था नाचात येईन, अंगण वाकडे, अशी झाली आहे. कोरोना काळात राज्य सरकारने एक रूपयाही कोणाला दिला नाही, सगळे केंद्र सरकारने दिले आहे, असेही त्यांनी म्हटले.
अधिवेशनात सगळ्या गोष्टी बाहेर काढू -
जीएसटीचे केंद्राकडून पैसे आले आहेत. पण तरीही केंद्र पैसे देत नाही, अशी ओरड सुरू आहे. मात्र, केंद्र सरकार सगळे पैसे देते. तसेच कोरोना काळात गेल्या 3-4 महिन्यांत राज्यात कल्पनेच्या पलिकडे जीएसटी वाढला. या पैशांच राज्य सरकार काय करते, असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला. हे सरकार बंगल्याच्या नूतनीकरण, नवीन गाड्या घेणे आणि अनावश्यक गोष्टीवर पैसे खर्च करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
येत्या अधिवेशनात या सगळ्या गोष्टी बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.
मी माघार घेतली नाही, लढलो, जिंकलो -
पवारांना मुंबईत शिफ्ट व्हावे लागले. त्यांचे मतदान नोंदणी मुंबईत आहे. मी पार्टीची शिस्त पाळणारा आहे. त्यामुळे पार्टीने आदेश दिल्याने कोल्हापूर ऐवजी पुण्यातून लढलो आणि जिंकलो, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना लगावला.
ज्यांचे जळते, त्यांनाच कळते -
आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना 'आपण याबाबत गोपीचंद पडळकर यांना समज दिली आहे. महाराष्ट्राची संस्कृतीप्रमाणे बोलण्याबाबत सांगितले आहे. पण शरद पवार यांनी धनगर समाजाची आरक्षण बाबतीत केलेली फसवणूक, त्यामुळे ज्यांचे जळते, त्यालाच कळते या भावनेतून ते बोलतात', असे त्यांनी म्हटले.
हेही वाचा - ज्याला आपलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागतंय, त्याच्याबद्दल मी कशाला भाष्य करू - शरद पवार