सांगली - बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांचा फोटो असलेले भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जाता नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होता. यावर मोठा वादंग निर्माण झाला. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र हाळवणकर यांची पाठराखण केली आहे.
हाळवणकर म्हणाले होते, की हे ओळखपत्र चालत नाही. हे आपणाला माहिती आहे. तरीसुद्धा टोल नाक्यावरील कार्यकर्ते कार्ड बघितल्यावर त्या ओळखपत्रावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याने लफडे होऊ शकते. आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो. यामुळे आमदार, नेते आणि आणखी २-४ कार्यकर्ते गेले तरी काय अशा विचारातून सोडून देतात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.
सुरेश हाळवणकर यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला. यावर आज सांगली दौऱ्यावर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार हाळवणकर असे काही बोललेच नाहीत. भाजपच्या कार्डावर टोलनाक्यावर वाद घालू नका, असे त्यांनी म्हटल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी हाळवणकर यांची पाठराखण केली.