सांगली - केंद्र सरकारचे कृषी पॅकेज म्हणजे 'करप्शन ओरिएंटेड स्कीम' असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत असणाऱ्या आणि नव्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या पॅकेजमध्ये कोणतीच शाश्वत तरतूद नाही, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.
डॉक्टरमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्यावतीने अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी कृषी उद्योग आणि पूरक क्षेत्रासाठी १ लाख कोटीचे पॅकेज जाहीर करत ११ घोषणा केल्या आहेत. मात्र, यावर शेतकरी संघटनेने जोरदार टीका केली आहे. पाटील यांनी केंद्र सरकारच्या आजच्या पॅकेजमध्ये 2 कोटी शेतकऱ्यांच्या व्याजावर सूट या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी नव्या अशा कोणत्याही गोष्टी नसल्याचे स्पष्ट केले आहे. जनावरांचे लसीकरण हे नेहमीचे असून, जनावरांची संख्या आणि त्यावर सांगितलेला खर्च ना पटण्यासारखे आहे. तसेच पीक विमातर सुरूच आहे. त्यामुळे त्यामध्ये नवीन काही नाही. यासर्व गोष्टी भ्रष्टाचाराला बढावा देणारा आहेत.
उलट, लॉकडाऊनमुळे भाजीपाला, धान्य, फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होऊन त्यांना मदत मिळणे अपेक्षित होते. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी भरीव मदत देणे आवश्यक होते. शेतीमालाच्या हमीभावाचे धोरण तसेच शेती मालावरील निर्यातबंदी उठवणे आवश्यक होते. त्याची स्पष्टता मात्र कुठेच नाही आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटप्रमाणे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे यातून फक्त भ्रष्टाचार वाढणार आहे. केंद्र सरकारचे पॅकेज म्हणजे 'करप्शन ओरिएंटेड स्कीम' असल्याची टीका रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे.