सांगली - कवठेमहांकाळच्या बोरगावमध्ये उपसरपंच निवडीच्या वादातुन झालेल्या खून प्रकरणी 39 जणांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी उपसरपंच निवडीच्या वादातून भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून फुटीर भाजपा ग्रामपंचायत सदस्याची हत्या करण्यात आली होती. तर यावेळी झालेल्या हाणामारीत 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले होते.
उपसरपंच निवडीतुन सदस्याचा खून -
कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी गुरुवारी सरपंच निवडीच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या गटामध्ये तुफान हाणामारी प्रकार घडला होता. काठ्या, दगडांनी यावेळी मारामारी झाली होती. याता भाजपचे सदस्य असणाऱ्या पांडुरंग कोळे (वय-55) यांचा मृत्यू झाला. तर यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यासह 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले होते. भाजपामधून फुटून उपसरपंच निवडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीत भाजपचे 4 सदस्य सामील झाल्याच्या रागातून हाणामारीचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती तर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा - रेखा जरे हत्या प्रकरण : मास्टरमाईंड बाळ बोठेच्या अटकेसाठी रुणाल जरे यांचे उपोषण
दोन्ही गटाच्या 39 जणांवर गुन्हे दाखल -
घटनेनंतर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील या दोन्ही गटाच्या 39 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर 7 जणांना अटक करण्यात आली. बोरगावमध्ये भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. 11 पैकी 8 सदस्य हे भाजपाचे आहेत. तर आमदार सुमनताई व शिवसेना नेते अजितराव गटाचे 3 सदस्य आहेत. तर उपसरपंच निवडीसाठी भाजपचे 4 सदस्य हे फुटून आमदार गटात सामील झाले होते. आयोजित बैठकीला राष्ट्रवादीसह भाजपाचे फुटीर सदस्य जात असताना यावेळी भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता.