सांगली - सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असणाऱ्या एका महिला जवानाचा विजेचा झडका लागून मृत्यू झाला आहे. सना आलम मुल्ला (वय २२) असे या जवानाचे नाव असून त्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याच्या आंधळी गावच्या रहिवासी होत्या. राजस्थानमधील बिकानेर येथे त्या कर्तव्यावर होत्या. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.
आंधळी हे सना मुल्ला यांचे मूळ गाव आहे. गेल्या ३ वर्षांपासून त्या सीमा सुरक्षा दलात कार्यरत होत्या. सध्या त्या बिकानेर येथे कर्तव्यावर होत्या. आठ दिवसांपूर्वी सना यांना विजेचा झटका लागला होता. त्यांच्यावर राजस्थान येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सना यांच्या पश्चात आई,वडील आणि दोन भाऊ असा परिवार असून ते आंधळी गावामध्ये राहतात.
सोमवारी सना यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याअगोदर आंधळी गावातून अंत्ययात्रा हिंदकेसरी गणपतराव आंधळकर विद्यालयापासून काढण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पाटांगणासमोर श्रद्धांजली वाहण्यात येईल. रविवारी सकाळी ही घटना कळल्यानंतर आंधळी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. सोमवारी सुद्धा आंधळी येथील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.