सांगली - तासगाव तालुक्यात नुकताच एक आगळा-वेगळा विवाहसोहळा पार पडला. या लग्नातील नवरदेव ना घोड्यावर बसून आला, ना गाडीतून. हा नवरदेव बैलगाड्यांमध्ये आपले वऱ्हाड घेऊन लग्न कार्यालयात दाखला झाला.
तासगाव तालुक्यातील लोढे गावातील मनोज ठोंबरे यांचा विवाह पेडगावातील अश्विनी हिच्याशी झाला. दोन्ही गावांच्या दरम्यान असणाऱ्या चिंचणी या ठिकाणी या सोहळ्याचे स्थळ ठरले होते. या लग्नसोहळ्याच्या ठिकाणी नवरदेवाने बैलगाडीने धुरळा उडवत एंट्री केली. नवरदेव मनोज हा बैलागाड्यांच्या जथ्थ्यातून आपले वऱ्हाड घेऊन लग्नासाठी आला. नवरदेवाची ही अनोखी वरात पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
हेही वाचा - मुंबईचे मावळते पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना निरोप
मनोज हा शासकीय सेवेत नोकरीला असून त्याच्या घरची परिस्थितीही उत्तम आहे. तरीही आपल्या लग्न सोहळ्यासाठी मनोजने आपल्या घरात असणारी बैलगाडी घेऊन जाण्याचा निर्धार केला. त्याच्या घरच्यांनासुद्धा ही कल्पना आवडली. त्यामुळे मनोजसह संपूर्ण वऱ्हाडही याच पद्धतीने कार्यालयात आले.
आज काल लग्नात वधू-वरांची एंट्री हायफाय पद्धतीने करण्याकडे सगळ्यांचा कल आहे. मनोजने मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने बैलगाडीतून लग्नाला जाण्याचा घेतलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे.