सांगली - गायनाची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दृष्टीहीन असलेल्या इस्लामपूर येथील शितल साळुंखे हिने रेडिओ जॉकी बनण्याचे स्वप्न साकार केले आहे. डोळस असून सुद्धा नशिबाला दोष देत बसणाऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. तिने खासगी एफएमने आरजेसाठी घेतलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सांगली वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील शितल विश्वास साळुंखे ही आठवीमध्ये शिक्षण घेत असताना ताप आल्याचे निमित्त झाले आणि डोळ्याच्या अंतर्गत भागातील नसा कमजोर झाल्या आणि एका क्षणात तिच्या समोरून जग नाहीसे होऊन समोर काळा कुट्ट अंधार पसरला. आई राजश्री, वडील व डॉक्टर असणारी बहीण अर्चना आणि देशाच्या तंत्र शिक्षण परिषदेत उच्च पदावर असणारा भाऊ अमित, वहिनी सख्या बहिणीप्रमाणे मदत करणारी माणसे यांनी शितलला लागेल ती मदत करून तिला अंध असल्याचे कधी जाणवू दिले नाही. त्यामुळे नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा तिने पुढचे शिक्षण चालू केले. कला शाखेच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले. पुढे आई-वडिलांच्या सांगण्यावरून शिक्षण थांबवले व गायन वादन, चित्रकला, वक्तृत्व यामध्ये सहभाग घेतला.
गायनाचे धडे, सूरपेटी शिकण्यासाठी शितल शहरातील एका नामवंत उस्तादांकडे गेली. त्यांनी ही मुलगी सूरपेटी शिकू शकणार नाही, अशा शब्दात सांगून टाकले. पण हार मानेल ती शितल कसली. तिने आपल्याच शाळेतील संगीत शिक्षकाकडे ही कला आत्मसात केली. आज चक्क खासगी रेडिओ एफएमने आरजेसाठी घेतलेल्या स्पर्धेमध्ये शितलने पहिला क्रमांक पटकावला आहे. यासाठी पहिली फेरी 21 डिसेंबरला इस्लामपूरमध्ये झाली आणि 4 जानेवारीला सांगलीमध्ये अंतिम फेरी झाली. शितलने आपल्या सुमधुर आवाजाच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे.
ही स्पर्धा सांगली कुपवाड मिरज शहर महानगरपालिका व एक खासगी एफएमने घेतली होती. शितल आज अंध असूनही ती कोणावरही विसंबून नाही. ती स्वतः आपली कामे करत असते, अशी ही दृष्टीहीन शितल आज आपल्या आवाजावर 'आरजे' बनली आहे.