सांगली - भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा उद्योग सुरू आहे, तसेच अंबानीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेचा भाजपकडून दुरुपयोग करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच राज्यातील वीज तोडणीवरून सरकारला गर्भित इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न -
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगलीमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सचिन वझे प्रकरणावरून बोलताना महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सचिन वझेला खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आलेला आहे,डबल ढोलकी वाजवण्याचे काम भाजप करत असून मनसुख हिरेन प्रकरणी तपास आता एनआयएकडून सुरू आहे,त्यामुळे त्याचा तपास होईल,
असा टोला लगावाला आहे.
हे ही वाचा - पश्चिम बंगालमध्ये भाजपाने सत्तेचा गैरवापर केला - शरद पवार
अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन..
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना पटोले म्हणाले, 171 आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीला घाबरत नाही. अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन घेऊन येत्या काही दिवसात अध्यक्ष निवड होईल, असे पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कुणाला घाबरण्याचे कारण नाही तसेच महाराष्ट्र हा काँग्रेस विचारांचा राहिला आहे. राज्याच्या विकासाची दिशा आम्ही देण्याचे प्रयत्न करू आणि राज्यात काँगेस लवकरचं एक नंबरचा पक्ष होईल, पण केंद्र सरकार राज्याला जी मदत हवी आहे, ती करत नाही, असा आरोप पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केला.
राज्यपाल नव्हे भाजप भवन -
राज्यपाल नियुक्त आमदारावर बोलताना पटोले म्हणाले, आपल्याला आधीही वारंवार सांगितले आहे, राज्यपाल भवन हे भाजप भवन झाले आहे आणि राज्यपाल राज्याचे प्रमुख आहेत, हे लक्षात ठेवावे. अशा वेळी पक्षपात करणे चुकीचे आहे.
देवाच्या नावाने गोळा केलेले पैसे कुठे आहेत ?
तसेच केंद्रावर टीका करताना पटोले म्हणाले, जनतेला लुटण्यासाठी केंद्र सरकार बसले आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी करतो असे मोदी बोलले होते, पण झाली का कर्जमाफी ? असा सवाल करत या भाजपने राममंदिर उभारण्यासाठी देवाच्या नावाने कोरोनाच्या काळातही पैसे गोळा करायचे काम केले आहे. गोळा झालेला कोट्यवधीचा निधी कुठे आहे ? असा सवाल करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
हे ही वाचा - अँटिलिया प्रकरण : वझेंनंतर मुंबई पोलिसांतील आणखी काही अधिकाऱ्यांची होणार चौकशी?
वीज तोडू देणार नाही -
तर राज्यातील विजेच्या बिलावरून सुरू असलेल्या मुद्द्यावर बोलताना, रीडिंग प्रमाणे शेतकऱ्यांना बिल दिले पाहिजे, 3 एचपी ऐवजी 5 एचपी प्रमाणे बिल दिले गेली आहेत. त्यामुळे रिडींग प्रमाणे बिले दिली पाहिजेत. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी होऊ देणार नाही, मग काय परिणाम व्हायचे ते होऊ देत आणि सोमवारी ऊर्जा विभागा सोबत बैठक घेणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
हे सरकार 5 वर्ष टिकेल -
तसेच जे लोक आतापर्यंत सरकार जाणार अशी भाषा करत होते, ते आता त्यांची भाषा बदलली असून आता राष्ट्रपती राजवट लागू होणार, अशी भाषा वापरत आहेत. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास व्यक्त करत भाजपाच्या नेत्यांना पटोले यांनी टोला लगावला आहे.