सांगली - सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. भाजपाचे अंकलखोप जिल्हा परिषद गटाचे सदस्य नितीन नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत नवले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपाला जिल्हा परिषदेमध्ये धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सांगली जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. शिवसेना आणि अन्य आघाडीच्या जोरावर जिल्हा परिषदेत भाजपाचे बहुमत आहे. 60 पैकी 23 सदस्य हे भाजपाचे आहेत, तर अपक्ष व इतर आघाडी आणि शिवसेनेने भाजापाला पाठिंबा दिल्याने भाजपाचे बहुमत झाले आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे विरोधी पक्षात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची 14 अधिक 1 आणि काँग्रेसचे 10 सदस्य अशी स्थिती आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना मुदत वाढ
महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाला खिंडार पाडत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सत्ता खेचून आणली होती. राजकीय हादरा देणाऱ्या या घडामोडीनंतर जिल्हा परिषदेत ही सत्तातंर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर भाजपाने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी टाळून, पहिल्याच अध्यक्ष, उपाध्यक्षांना मुदत वाढ दिली होती.
नवले यांना आपल्या गोटात खेचण्यात पाटलांना यश
मात्र गेल्या दोन महिन्यांपासून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विविध विकासाकामाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेशी संपर्क वाढवला होता, त्यातून त्यांना भाजपाचे पलूस तालुक्यातील अंकलखोपचे जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळाले. नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत नवले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
जिल्हा परिषदेची पक्षनिहाय सदस्य संख्या
भाजप - 24 + 1 अपक्ष
भाजपाचे घटक पक्ष
रयत विकास आघाडी - 4
शिवसेना - 3
घोरपडे गट - 2
स्वाभिमानी - 1
एकूण भाजपा - 35
राष्ट्रवादी काँग्रेस - 14 + 1 अपक्ष
कॉंग्रेस - 10
काँग्रेस आघाडी - 25
एकूण सदस्य = 60