सांगली - मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा दावा आजपर्यंत भाजपकडून करण्यात येत होता. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्षांनी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात तशी चर्चा झाल्याचे बोलण्याच्या ओघात स्पष्ट केले. अमित शहा यांनी देखते है, असे म्हटले होते आणि उद्धव ठाकरेंना हो वाटले, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याचे समोर आणले. त्यामुळे, चर्चा झाली नाही, असा दावा करणारी भाजप तोंडघशी तर पडणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - शरद पवारांनी मला शिकवू नये, चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
सांगलीमध्ये काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी केंद्राच्या बजेटबाबत माहिती दिली. वास्तविक सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका महापौर आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बद्दलच्या चर्चेसाठी पाटील सांगलीमध्ये आले होते. त्याबाबतच्या बैठकासुद्धा त्यांनी भाजप नेते व पदाधिकारी यांच्यासोबत घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये महापालिका, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बदलांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून बोलताना, आज आपण पदाधिकाऱ्यांचा मानस जाणून घेतला आहे. महापौर पदाची निवड 23 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील, असे पाटील म्हणाले.
देखते है, पण त्यांना वाटले हो..
अध्यक्ष पद बदलायचे फायनल झाले का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर असे काही ठरले नाही, पण नाही असेही ठरले नाही आणि हो असेही ठरले नाही. अमित भाई आणि उद्धवजी यांचा जसा संवाद झाला तसे आहे, असे सांगत अमित भाईंनी सांगितले होते देखते है आणि उद्धवजी यांना वाटले देखते है म्हणजे हो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याचा संवाद स्पष्ट केला. तसेच, सिंधुदुर्गमध्ये अमित शहा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे, आजपर्यंत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झालीच नसल्याच्या भाजपच्या दाव्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - सांगलीच्या वाळव्यामध्ये दोन गटात तुंबळ राडा, 4 ते 5 जण जखमी