सांगली - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या नुकसान पाहणी दौऱ्यावरून भाजपाचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या वयातही नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवारांना शेताच्या बांधावर जावे लागते, हे राज्य सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पवारांच्या दौऱ्यावरून भाजपाचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. आज अतिवृष्टीच्या संकटानंतर शरद पवार यांना शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागते हे राज्य शासनाचे अपयश आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
विरोधात असताना पवारांनी दौरा केला असता तर ठीक होते. मात्र, आज शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सत्तेत आहे आणि या आघाडीच्या नेतृत्वाला बांधा-बांधावर जावे लागते. त्यामुळे त्यांनी राज्यात नेमलेले कारभारी अपयशी ठरले आहेत हे स्पष्ट झाले, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.
राज्यातील निसर्ग चक्रीवादळ असो, महापूर असो किंवा कोरोनाचे संकट असो, या सर्वांमध्ये हे महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. या सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत त्याचबरोबर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.