सांगली - विरोधी उमेदवाराच्या प्रचाराप्रकरणी भाजपच्या ३ तालुकाध्यक्षांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आपल्या पक्षाऐवजी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा ठपका ठेवत खुलासा देण्याच्या नोटीस देत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असल्याची बाब समोर आली आहे.
सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका पाटील निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात पूर्वी भाजपमध्ये असणारे गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या आटपाडी, खानापूरच्या ३ तालुकाध्यक्षांकडून पक्षाच्या उमेदवाराऐवजी विरोधी उमेदवार पडळकर यांचा प्रचार करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आल्याने पक्षाचे सरचिटणीस सुरेंद्र चौगुले यांनी आटपाडी तालुका अध्यक्ष प्रभाकर पुजारी, खानापूर तालुका अध्यक्ष संग्राम माने, आणि सुहास पाटील भाजप युवा मोर्चा खानापूर तालुका अध्यक्ष या तिघांना नोटिसा बजावल्या आहेत. पक्षविरोधी कारवाई केल्याचा खुलासा करा म्हणून नोटीसा पाठवल्या आहेत.
सांगलीत भाजपचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार नियोजनाच्या बैठकीस देखील या ३ तालुका अध्यक्षांनी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे पक्षविरोधी कारवाई करत असल्याचा ठपका ठेवत खुलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. जर तातडीने खुलासा केला नाही, तर पक्षविरोधी वर्तन केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
वास्तविक हे तीनही भाजपचे तालुकाध्यक्ष सध्या वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असल्याची बाब समोर आली आहे. तर पडळकर याच्या सांगलीतील सभेला देखील या तिघांनी हजेरी लावली होती. या रागातून भाजप पक्षाने ही नोटीस पाठवली आहे. तर आता हे तालुकाध्यक्ष पक्षाच्या नोटीसला उत्तर देणार की अध्यक्षपदाचा राजीनामा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.