सांगली - मिरजेच्या अपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणी भाजपा नगरसेवकांनी पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या मागणीसाठी महापालिकेच्या महासभेत थेट तिरडी घेऊन भाजपा नगरसेवकांनी प्रवेश करत कारवाईची मागणी केली आहे. शिवाय भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे.
मिरजेच्या अपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्ण मृत्यूप्रकरणी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहेत. रुग्णालयाला परवानगी देणार्या आयुक्त व महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांच्या चौकशी करत कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आज (सोमवारी) सांगली महापालिकेसमोर आंदोलन केले आहे. भाजपा नगरसेवकांनी आज पार पडणाऱ्या महासभेत थेट प्रतीकात्मक तिरडी घेऊन पालिकेने रूग्णालयाला परवानगी दिलीच कशी? हा मुद्दा उपस्थित करत या सर्व प्रकरणी चौकशीची मागणी करत आयुक्तांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसर्या बाजूला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महासभा सुरू असताना पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करत प्रतीकात्मक तिरडी ठेवून आंदोलन केले आहे. यावेळी महापालिका आरोग्य अधिकार्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
हेही वाचा -दहिसर परीसरात वकिलावर तलवारीने हल्ला, भररस्त्यावर गुंडांचा हैदोस