सांगली - दूध "श्वेतक्रांतीचे जनक" म्हणून वर्गीस कुरियन ( Dr. Varghese Kurien ) यांना संपूर्ण देशात ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणाऱ्या दुध व्यवसायाला नवी संजीवनी देण्याचे काम कुरियन यांनी केले. त्यामुळे आज देश आणि महाराष्ट्र दूध व्यवसाय भरभराटीला आला. आज त्यांची जयंती साजरी होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या दूध व्यवसायाला वर्गीस कुरीयन यांच्या दूध क्रांतीमुळे मोठा फायदा झाला आहे. आज जिल्ह्यात सहकारा ऐवजी खाजगी दूध संस्थांची मक्तेदारी असली, तरी दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नती साधणारा व्यवसाय बनला आहे.
श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन -
श्वेतक्रांतीचे जनक म्हणून वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. वर्गीस कुरियन यांनी देशात दूध क्षेत्रामध्ये "ऑपरेशन फ्लड" म्हणजेच दूध महापूर ही सहकारी तत्वावर योजना सुरू केली. गुजरात राज्यात पहिल्यांदा ही योजना अस्तित्त्वात आली. त्यानंतर महाराष्ट्रात 1977 मध्ये कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दूध महापूर योजनेची सुरवात झाली. कालांतराने सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात 1985 मध्ये कुरियन यांची "दूध महापूर योजना" पुणे, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यात सुरू केली. ज्यातून वसंतदादा पाटील जिल्हा दूध संघ आणि राजारामबापू दूध संघ अशा सहकारी संस्था यांना अधिकचे बळ मिळाले. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील दूध व्यवसायातील घोडदौड वाढत गेली.
दूध व्यवसाय भरभराटीला आला -
सुरुवातीला सहकारी संस्था असणाऱ्या या जिल्ह्यात हळूहळू खाजगी संस्थांचे प्राबल्य वाढल्याचं पाहायला मिळालं. गावागावात आज दूध संकलन केंद्र निर्माण झाली आहेत.दुध विक्रीचे आठवड्यात तात्काळ पैसे मिळत असल्याने शेतकरयांचा खाजगी दूध संस्थांकडे मोठ्या प्रमाणात ओढा आहे. असे जरी असले तरी जिल्ह्यामध्ये राजारामबापू दूध संघ,हुतात्मा दूध संकुल सारख्या सहकारी दूध संस्था आपले पाय घट रोवून उभे आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग -
वर्गिस कुरियन यांनी खरे तर खासगीकरणाच्या विरोधात सहकारी संस्थांना बळ देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला. तो बहुतांश यशस्वीही झालेला आहे. मात्र सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सहकारी संस्थांच्या तुलनेने खाजगी दूध संस्थांचे प्राबल्य अधिक वाढलेले आहे. अनेक नामवंत कंपन्या, राजकीय पुढाऱ्यांच्या दूध संस्था, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आहेत. हे जरी असलं तरी मुळात वर्गिस कुरियन यांच्या दूध क्रांतीचा मूळ उद्देश जो शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीचा तो सफल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गावा-गावात दूध संकलन केंद्र -
कारण आजच्या घडीला सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 15 हुन अधिक सहकारी आणि खाजगी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या दूध डेअरी सुरू आहेत. तर 500 हुन अधिक दूध संकलन करून ते छोट्या मोठ्या डेअरींना देणारे युनिट तालुकास्तरावर कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण जवळपास दररोज 10 लाख लिटरहुन अधिक दुधाचे संकलन होत आहे. यामध्ये वाळवा, मिरज, कडेगाव, खानापूर तालुक्यात अधिकचे दूध उत्पादन होते.
"दूध महापूर" योजना ठरली नवी दिशा -
वर्गिस कुरियन यांच्या दूध क्रांती बाबत वसंतदादा पाटील जिल्हा दूध संघाचे माजी व्यवस्थापक व दुध तज्ञ दिलीप पाटील म्हणाले, शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साठी दूध धंदा हा एक चांगला व्यवसाय असल्याचं त्यांनी ओळखलं होतं आणि त्यातून त्यांनी गुजरात मधून या दुग्ध क्रांतीला सुरवात केले.गावा-गावातल्या लोकांना एकत्र करून सहकाराच्या माध्यमातून दूध व्यवसाय करता येतो. हे त्यांनी देश नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचलेल्या अमूल ब्रॅण्डच्या माध्यमातून आपल्याला आज पहायला मिळते. महाराष्ट्र मधील तीन टप्प्यांमध्ये वर्गीस कुरियन यांची "दूध महापूर"योजना राबवण्यात आली.पहिल्या टप्प्यात जळगाव, कोल्हापूर नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली, पुणे, अहमदनगर आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सोलापूर व सातारा या जिल्ह्यांचा समावेश होता.
वर्गीस कुरीयन' यांचे विचार आणि संकल्प कारणीभूत -
सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्हा भौगोलिक दृष्ट्या हा अर्धा जिल्हा अवर्षणग्रस्त आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना दूध धंदा हा आर्थिक उत्पन्नाचा एक उत्तम स्त्रोत बनला. 1985 अधिक सांगली जिल्ह्यामधील काही मोजक्याच सहकारी दुध संस्था आणि चितळे सारखं एक नामांकित ब्रँड होते. मात्र आजच्या घडीला सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध डेअरी अस्तित्वात आहेत. काही सहकारी तर काही खाजगी संस्थांच्या आहेत. त्यामुळे दररोज लाखो लिटर दुधाचे उत्पादन होत असून रोजची कोटींची उलाढाल होते. खरंतर या सर्वांमागे 'वर्गीस कुरीयन' यांचे विचार आणि संकल्पना कारणीभूत असल्याचे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे मत दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.