सांगली - पुराने थैमान घातल्याने सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. काही नागरिक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची मदतीसाठी याचना सुरू आहे. मात्र, प्रशासकीय मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप पूरग्रस्तांनी केला आहे.
जिल्ह्यातील हरिपूर, भिलवडी या गावात हजारो नागरिक अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी अद्यापही प्रशासकीय मदत मिळाली नाही. भिलवडी गावातील अडकलेल्या नागरिकांना 3 दिवसापासून खाण्या-पिण्याची काहीच सोय करण्यात आलेली नसल्याचे नागरिक सांगत आहेत. या गावात अडीच ते तीन हजार नागरिक अडकल्याचे बोलले जात आहे. या गावातील नागरिक मदतीसाठी याचना करत आहेत. काही पुढारी बोटीतून गावात येत असून ते त्यांच्याच माणसांना घेऊन परत जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या नागिरकांना ३ ते ४ तासात मदत न मिळाल्यास गावातील तरुण जलसमाधी घेण्याची तयारी करत असल्याची माहिती येथील तरुणांनी दिली आहे.