सांगली - एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers Strike) संपाला जवळपास 1 महिना झाला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांनी 'भीक मांगो' आंदोलन (Bhik Mango Agitation By ST Workers) करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारमध्ये एसटीचे विलणीकरण झालेच पाहिजे, अशी मागणी करत यावेळी सरकारविरोधात निदर्शनेही करण्यात आली.
महिला कर्मचार्यांनी रस्त्यावर उतरून मागितली भीक -
सांगलीत आज एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलणीकरण करावे, अशी मागणी केली. यावेळी महिनाभराच्या संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी भीक मागत आपल्या भावना मांडल्या. या संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. सांगलीत एसटी स्थानकांच्या बाहेरील दुकानांमध्ये एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांनी 'भीक मांगो' आंदोलन करत आपल्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न -
एसटी महामंडळ हे ग्रामीण भागातील वाहतुकीचा कणा आहे. खास करून राज्यातील दुर्गम भागात असलेले विद्यार्थी आणि आदिवासी तसेच मोलमजुरी करणारे नागरिक एसटीचे मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून एसटी सेवा ठप्प असल्यामुळे याचा थेट परिणाम या मोठ्या वर्गावर झाला आहे. त्यामुळे या संपाचा तोडगा निघावा यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मुख्य मागणी राज्य सरकार सध्या तरी पूर्ण करण्याच्या मनस्थितीत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा पर्याय राज्य सरकार समोर ठेवला. त्यानुसार राज्यातील काही ठिकाणी कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही आंदोलन सुरू आहे.