सांगली - तौक्ते चक्रीवादळाचा फटका सांगली जिल्ह्यालाही बसला आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर या ठिकाणी सहा एकरावरील केळी बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा नुकसान झाले आहे.
सहा एकर केळीबाग जमीनदोस्त
तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सांगली जिल्ह्यातही काल (दि. 16 मे) दुपारपासून आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. दरम्यान, रात्री उशिरा चक्री वादळाचा मोठा फटका मिरज तालुक्यातील कवलापूर या ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी निशा गाडगीळ या महिला शेतकऱ्याची सहा एकर केळीची बाग उध्वस्त झाली आहे. जैन नाईन या केळीच्या वाणाचे उत्पादन निशा गाडगीळ यांनी आधुनिक पद्धतीने घेतले होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे त्यांची सहा एकरावरील केळी बाग भुईसपाट झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान फळपीक विमा योजनेतून मदत मिळावी, अशी मागणी निशा गाडगीळ यांनी केली आहे.
हेही वाचा - नातेवाईकांची अंत्यविधीकडे पाठ; कोरोनाबाधित मृतदेहांवर 'त्या' तिघी नगरसेविकांनी केले अंत्यसंस्कार