सांगली - चुलतीने चार वर्षाच्या पुतण्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. सांगलीतील वडियेरायबागमध्ये हा प्रकार घडला. पैसे चोरीचा संशय घेतल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी चुलतीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथील बेपत्ता असलेल्या राजवर्धन परशुराम पवार या बालकाचे अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना राजवर्धनच्या चुलतीनेच हा खून केल्याचे उघडकीस आले. शुभांगी प्रदीप जाधव असे आरोपीचे नाव आहे. शुभांगी हिने स्वतःच्या राहत्या घरी तोंडावर उशी दाबून राजवर्धनचा निर्घृणपणे खून केला. मृत राजवर्धनचे आजोबा आणि त्याच्या वडिलांनी घरातून चोरीला गेलेल्या अडीच लाख रुपयांचा संशय शुभांगीवर घेतला होता. त्याचा राग मनात धरून शुभांगीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - सांगली जिल्ह्यातील देवर्डेच्या महिला सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर
या प्रकरणी चिंचणी-वांगी पोलिसांनी शुभांगी जाधवसह तिचा मावसभाऊ शंकर वसंत नंदीवाले (वय-२६, रा तडसर, ता.कडेगाव) या दोघांना अटक केली आहे. २१ जानेवारीला शुभांगीने राजवर्धन हा अंगणवाडीत निघाला असताना त्याला आपल्या घरी नेले होते. त्यानंतर शुभांगीने तिचा मावसभाऊ शंकर नंदीवाले याला बोलावून राजवर्धनचा खून केला. त्याचा मृतदेह प्रवासी बॅगेत भरून हिंगणगाव खुर्द येथील देसकट वस्तीजवळ असणाऱ्या वारूसळा ओढ्याच्या पात्रात टाकून दिला.