सांगली- पोलीस सेवेदरम्यान पदाचा गैरवापर करण्याच्या कारणावरून सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी एका सहायक पोलीस निरीक्षकासह हवालदाराला निलंबित केले आहे. कुपवाड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संग्रामसिंह शेवाळे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण यादव या दोघांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संग्रामसिंह शेवाळे सध्या सांगली पोलीस दलात मानव संसाधन शाखेत तर यादव हे कोकरूड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कुपवाड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक असताना शेवाळे व यादव यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. या आधारावर सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे व हेड कॉन्स्टेबल प्रवीण यादव यांच्यावर कर्तव्यात कसूर, अधिकाराचा गैरवापर व कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक असा ठपका ठेवत संग्रामसिंह शेवाळे व प्रवीण यादव यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.