सांगली - अॅपेक्स केअर हॉस्पिटलमधील कोरोनाचे 87 रुग्ण मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर महेश जाधव यांच्या डॉक्टर भावालाही अटक करण्यात आली आहे. मदन जाधव असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. जाधव यांच्यासह रुग्णालयातील एका ब्रदरलाही मिरज पोलिसांनी अटक केली आहे.
- डॉक्टर भावालाही अटक -
मिरजेतील अॅपेक्स केअर हॉस्पिटलमधल्या 87 कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी तपासामध्ये अनेक गंभीर बाबी आता समोर येत आहेत. रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आतापर्यंत डॉक्टर महेश जाधव यांच्यासह रुग्णालयातल्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तर रुग्णालयाला परवानगी कशी मिळाली? यावरून गंभीर आरोप महापालिका प्रशासनावर करण्यात आले आहेत. या सर्वच बाबी तपासत असताना डॉक्टर महेश जाधव यांच्या भावाने कोविड हॉस्पिटलसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुरवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महात्मा गांधी चौक पोलिसांनी डॉक्टर महेश जाधव यांचा भाऊ डॉक्टर मदन जाधव यांना शनिवारी अटक केली आहे.
- सोमवारपर्यंत पोलीस कोठडी -
डॉक्टर मदन जाधव यांचे सांगलीमध्ये जाधव सुपरस्पेशालिट हॉस्पिटल आहे. तर पोलिसांनी मदन जाधव यांच्या रुग्णालयातील ब्रदर असणाऱ्या बसवराज कांबळे यांनाही अटक केली आहे. मिरजेच्या न्यायालयात हजर केले असता, डॉक्टर जाधव आणि ब्रदर कांबळे यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.