सांगली - भाजपचा टीशर्ट घालून शेतकऱ्याने केलेली आत्महत्या म्हणजे भाजप-शिवसेनेवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही, याचा धडधडीत पुरावा आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. ते इस्लामपूरमध्ये प्रचार सभेत बोलत होते.
इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूरमध्ये जाहीर प्रचार सभा पार पडली. या सभेसाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासभेत बोलताना जयंत पाटील यांनी राज्यातील भाजप-सेनेच्या सरकारवर हल्लाबोल केला.
हेही वाचा - निवडणुकीतले 'बाप'माणूस; मुलांसाठी करतायेत जीवाचं रान
खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आत्महत्येवर बोलताना, त्या शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणजे भाजप-सेनेच्या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही, याचा धडधडीत पुरावा आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सभेत एका शेतकऱ्याने कर्जमाफीचा प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री यांनी त्या शेतकऱ्याचा 'नमुने' असा उल्लेख केला होता. जर त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याच्या बाजूने विचार करून, रोखठोक निर्णय सांगितले असते, तर आज त्या 35 वर्षीय शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, असा आरोप कोल्हे यांनी करत मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा का दाखल होऊ नये, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा - वित्तपुरवठा...! ८ दिवसात ८१ हजार कोटींचे कर्ज विविध मेळाव्यांतून वाटप