सांगली - वसंतदादा सेवा प्रतिष्ठानच्यावतीने सांगली महापालिकेला शववाहिका भेट देण्यात आली. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या हस्ते नवीन शववाहिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे पालिका प्रशासनाला मदत होणार आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. महापालिका क्षेत्रातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशात एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शववाहिकेचा मोठा प्रश्न निर्माण होत होता. ५-६ तास मृतदेह ताटकळत पडण्याबरोबर, शववाहिका नादुरुस्त होऊन अनेक वेळा मृतांच्या नातेवाईकांना धक्का मारण्याची वेळ आली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनावर टीका होता आली आहे.
ही बाब लक्षात घेऊन सांगलीतील वसंतदादा सेवा प्रतिष्ठान, यांच्या माध्यमातून व सांगली जिल्ह्यातील दक्षिण भारतात असलेल्या गलाई बंधू यांच्या मदतीने सांगली महापालिकेस बुधवारी नवी शववाहिका भेट देण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील व विशाल पाटील यांच्या हस्ते आयुक्त नितीन कापडणीस यांना शववाहिकेची किल्ली प्रदान करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी अद्यावत व शंभर टक्के निर्जंतुकीकरण शववाहिकेची पाहणी करुन वसंतदादा सेवा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. अशा महामारीच्या परिस्थितीमध्ये दानशूर व्यक्ती , स्वयंसेवी संस्था यांनी पुढे येवून प्रशासनास सहकार्य करावे. तरच या महामारीवर आपण सर्वजण एकजुट होवून विजय मिळवू शकतो, असे मत जिल्हाधिकारी चौधरी यांनी व्यक्त केले.
सद्या सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामधून अनेक रूग्णांची संख्या वाढून मृत्यूचे सुध्दा प्रमाण वाढलेले आहे. विशेषकरुन महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. प्रशासनावर याबाबत प्रचंड तणाव निर्माण होत आहे. कोरोना अथवा इतर संसर्गजन्य रोगामधून एखाद्या रूग्णाचा मृत्यू झाल्यास खासगी रूग्णवाहिका मृत व्यक्ती घेण्यास टाळाटाळ करतात अथवा मोठ्या भाड्याची अपेक्षा करतात. हे भाडे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही. म्हणून वसंतदादा सेवा प्रतिष्ठान सांगली व दक्षिण भारतात असलेल्या गलाई बांधवांकडून महापालिकेस शववाहिका देण्याचे निश्चित केल्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सांगितले.