सांगली- वीज बिले फाडून उधळण करत वाढीव वीज बिलांच्या विरोधात सांगलीत आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शहरातल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेत शंखध्वनी करत वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध नोंदवला. तसचे तातडीने वाढीव वीज बिले रद्द करण्याची मागणीही केली.
हेही वाचा- 'वा रे वा..! मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत, अन् कोरोनाच्या पॅकेजसाठी नाहीत'
सांगली शहरातल्या नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून अव्वाच्या-सव्वा वीज बिले देण्यात आली आहेत. कोरोनामुळे आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना या वाढीव वीज बिलामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाचशे ते सहाशे रुपये बिल येणाऱ्या ग्राहकाला वीज वितरण कंपनीकडून दोन हजारपासून चार हजारापर्यंत बिलांची आकारणी करण्यात आली आहे. या वाढीव वीज बिलांच्या विरोधात सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.
शहरातल्या हिराबाग चौक येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिल विरोधात जोरदार निदर्शने करत शंखध्वनी करण्यात आला. त्याचबरोबर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच यावेळी संतप्त नागरिकांनी वीज बिले फाडून त्याची उधळण केली. आंदोलनात माजी आमदार नितिन शिंदे, असिफ बावा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे नेते नागरिकांचा सहभाग होता. राज्य सरकारने तातडीने अन्यायी वीज बिले रद्द करावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
हेही वाचा- 'वा रे वा..! मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत, अन् कोरोनाच्या पॅकेजसाठी नाहीत'