सांगली : सांगली महापालिका क्षेत्राबरोबर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर धान्य मार्केटही बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवार व गुरुवारपासून शनिवारीपर्यंत मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्याबरोबर सांगली महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे. रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीच्या आवारात पार पडणारे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सौदे व धान्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, अडते या सर्वांनी मिळून काही दिवसांसाठी मार्केट यार्डातील व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये बुधवारपासून शनिवारपर्यंत हळद, गुळ, बेदाणा सौदे बंद राहणार आहेत. तर, गुरुवारपासून शनिवारपर्यंत मार्केट यार्डमधील धान्य मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खरेदीदार व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार आदी सर्व घटकांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच शनिवारी या सर्व घटकांची बैठक होऊन त्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.