सांगली - पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी येथील कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे. सामाजिक संघटना आणि पूरग्रस्तांनी हे आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने एका संतप्त पूरग्रस्त तरुणाने आंदोलनादरम्यान थेट नदीत उडी घेतली.
ऑगस्ट 2019 मध्ये जिल्ह्यात महापूर आला होता. या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीत पाणी शिरल्याने कुटुंबेच्या कुटुंबे उध्वस्त झाली. या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान आणि मदतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून मदतही देण्यात आली. मात्र अजूनही जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान आणि घोषित करण्यात आलेली मदत मिळाली नाही. म्हणून पूरग्रस्तांना त्यांची हक्काची मदत मिळावी, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी आणि पूरग्रस्तांनी मिळून आंदोलन केले आहे.
हेही वाचा - मी जर शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही.... अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
तसेच ज्या नदीमुळे या शहराला महापुराचा फटका बसला त्याच कृष्णा नदीमध्ये उतरत जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने याठिकाणी असणाऱ्या एका संतप्त तरुणाने थेट नदीच्या पात्रामध्ये उडी घेतली. मात्र, याठिकाणी असणाऱ्या पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने पाण्यात उतरत तरुणाला नदीतून बाहेर काढत वाचवले आहे.