सांगली - जिल्ह्यात ऑक्सिजन बेडपासून रेमडेसिवीर इंजेक्शन व वैद्यकीय सेवेचा काळाबाजार चालू आहे. ही संघटित गुन्हेगारी आहे. अशा प्रकारचा काळाबाजार करणाऱ्यांंवर शासनाने मोक्का लावावा, अशी मागणी शहर जिल्हा सुधार समितीकडून करण्यात आली असल्याची माहिती ॲड.अमित शिंदे यांनी दिली.
वैद्यकीय सेवाचा काळाबाजार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रूग्ण व नातेवाईकांना ॲाक्सिजन, व्हेंटिलेटर व इंजेक्शनसाठी धडपडावे लागत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये लोकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड त्यासोबतच इंजेक्शन,औषधे मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. याबाबत शहर जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अॅड. अमित शिंदे यांनी राज्य शासनाकडे वैद्यकीय सेवेचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का लावा..
उपचाराअभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन, औषध मिळवण्यासाठी धडपडत आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही लोक वैद्यकीय सेवेचा काळाबाजार करताना दिसत आहेत. रेमडेसिवीरसारख्या इंजेक्शनचा काळाबाजार जिल्ह्यामध्ये उघडकीस देखील आला आहे. त्याचबरोबर सध्या आठशे रुपयाचे इंजेक्शन पंधरा ते वीस हजार रुपयांना विकणे, औषधांसाठी ज्यादा पैसे घेणे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरसाठी ज्यादा पैसे घेणे, रुग्णांची व नातेवाईकांची अडवणूक करून पैसे घेणे, तपासण्यांसाठी ज्यादा पैसे घेणे, असे प्रकार अनेक ठिकाणी होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाला कोरोनाच्या लाटेचा सामना करण्याबरोबरच याचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
वैद्यकीय सेवेचा काळाबाजार करणे हा गंभीर गुन्हा
वास्तविक वैद्यकीय सेवेचा काळाबाजार करणे हा गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा ज्या पद्धतीने केला जात आहे, ती पद्धत पाहता हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. इंजेक्शन व रुग्णसेवेचा काळाबाजार करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आरोग्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.