मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांनी एनसीबीवर (NCB) वेळोवेळी वेगवेगळे आरोप केले आहेत. आता नवाब मलिक यांच्याकडून पुन्हा एकदा एनसीबीवर नवीन आरोप करण्यात आला आहे. एनसीबीच्या प्रायव्हेट आर्मीने ओशिवरा येथे राहणाऱ्या अभिनेत्रीकडून वसुली केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून लावण्यात आला आहे.
हेही वाचा - Corruption In Maharashtra : महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात नंबर1 तर सिक्कीम मधे एकाही प्रकरणाची नोंद नाही
काही लोकांकडून एनसीबीचे अधिकारी बनून त्या अभिनेत्रीला धमकावून तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू होता. एनसीबीकडून पैसे उकळण्यासाठी प्रायव्हेट आर्मी तयार करण्यात आली आहे. यामध्ये काही लोक बॉलिवूडच्या नामवंत कलाकारांना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्याच लोकांकडून या अभिनेत्रीला देखील त्रास दिला जात होता. या सर्व प्रकाराला कंटाळून त्या अभिनेत्रीने आत्महत्या केली, असा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे.
मुंबई एनसीबीकडून काही लोक बनावट अधिकारी बनून बॉलिवूडच्या कलाकारांना त्रास देतात. तसेच, खोट्या प्रकरणांमध्ये त्यांना अडकवण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. हा सर्व प्रकार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या निर्देशातून सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे, आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे.
काय आहे प्रकरण?
23 डिसेंबरला एका अभिनेत्रीने ओशिवरा येथे राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या 28 वर्षीय अभिनेत्रीला दोन तोतया एनसीबी अधिकाऱ्यांनी एका पार्टीतून अटक केल्याचे भासवत 40 लाखांची मागणी केली होती. मात्र, हे सर्व प्रकरण दाबण्यासाठी अभिनेत्रीने वीस लाख रुपये देण्यासाठी तयारी दर्शवली. मात्र, त्यानंतर या दोन्ही तोतया एनसीबी अधिकाऱ्यांकडून त्या अभिनेत्रीला पैशासाठी सातत्याने त्रास दिला जात असल्याने त्या अभिनेत्रीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून 23 डिसेंबरला आत्महत्या केली होती.
हेही वाचा - Maharashtra Shakti Law : राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या संमतीनंतर 'शक्ती'ची अंमलबजावणी