सांगली - एका सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून कोट्यवधींचे सोने लुटल्याची घटना जतमध्ये घडली होती. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सव्वा दोन कोटींचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. प्रवीण उत्तम चव्हाण, विजय बाळासाहेब नांगरे, विशाल बाळू कारंडे, तात्यासो शेट्टीबा गुसळे, वैभव साहेबराव माने, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच सराफा व्यावसायिकाचा कामगारच या घटनेचा मास्टर माईंड असल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण -
जतच्या शेगाव रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी आटपाडी येथील सराफ व्यावसायिक बाळासाहेब सावंत हे सोने विक्री करण्यासाठी निघाले होते. भररस्तात सावंत यांना मारहाण करत त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून २ कोटी २६ लाख १३ हजारांचे ४ किलो ५३० ग्रॅम सोने लुटण्यात आले होते. सराफा व्यावसायिक सावंत यांच्यासोबत असणारा कामगार प्रवीण चव्हाण याच्या डोळ्यातही मिरचीपूड टाकण्यात आली होती. या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
कामगारच निघाला मास्टरमाईंड -
या घटनेची दखल घेऊन सांगली पोलिसांनी तातडीने पथके तैनात करत तपास सुरू केला होता. जत आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी याबाबत सखोल तपास करत सवांत यांचे कामगार प्रवीण चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीदरम्यान आपणच साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याची कबुली चव्हाण याने दिली. त्यानंतर चव्हाण याला अटक करत त्याच्या चार साथीदारांनाही अटक करण्यात आली. तसेच लुटलेले सव्वा दोन कोटी रुपयांचे सोन्याचे बिस्किटसह त्यांच्या ताब्यातील रिव्हॉल्वर आणि ओमनी गाडी, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हेही वाचा - धनंजय मुंडे प्रकरण : रेणू शर्माचा पुन्हा नोंदवला जाणार जबाब