सांगली - सगळ्या जगाची दिवाळी घरात साजरी होत असताना एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र रस्त्यावर गेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना घरी दिवाळी साजरी करण्याऐवजी रस्त्यावर का साजरी करावीशी वाटते? या मागचे भीषण वास्तव एसटी वाहक मीना जाधव यांच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंमुळे सहजपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
हेही वाचा - मृत्यु पप्पांना आधीच दिसला होता का ? आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांची भावनिक पोस्ट
मिनी संतोष जाधव, या सांगली एसटी आगारामध्ये वाहक पदावर गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहेत. घरची परिस्थिती तशी बेताची आहे. संतोष जाधव यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे. हे कुटुंब वारणाली येथे भाड्याच्या घरात राहताते. त्यांना दोन मुले आणि मीना जाधव यांच्या आई असा परिवार आहे. मुलांचे शिक्षण, घरभाडे, आरोग्य आणि इतर गोष्टी असा ढीगभर खर्च, पण मीना जाधव यांच्या हातात येणारा तुटपुंजा पगार आणि त्यांच्या पतीची जेमतेम कमाई यामुळे घर खर्च चालवणे कठीण असल्याने मीना जाधव यांना एसटीची डबल ड्युटी करावी लागेत. त्यामुळे, 15 दिवस मुलांची भेट देखील कठीण असते. एवढे करून देखील मीना यांना संसार चालवणे अवघड असल्याने घरात शिलाई मशीनवर कपडे देखील शिवावी लागतात. या शिवाय मेसचे डबे देखील बनवावे लागतात.
अश्रू नव्हे एसटी कर्मचाऱ्यांची कहाणी
मीना जाधव यांच्या आई चार घरांच्या स्वयंपाकाचे काम करून मीना यांच्या संसारला हातभार लावतात. एसटीचा तुटपुंजा पगार कधी औषध तर, कधी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यात जातो, असा हा खडतर प्रवास मीना जाधव यांचा असून ही सर्व तारेवरची कसरत सांगताना मीना जाधव यांच्या डोळ्यातून पाणी येते.
अडीच हजारात दिवाळी कशी, साजरी करायची?
ऐन दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना संप का करावा लागतो, हे सांगताना मीना जाधव म्हणाल्या, एसटीचा पगारच खूप कमी आहे. यंदा तर अडीच हजार रुपये देण्यात आले. आता या अडीच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? तेलाचा डबा खरेदी करायला देखील हे पैसे पुरत नाहीत. आता तुम्हीच सांगा, कशी दिवाळी साजरी करायाची? असा प्रश्न उपस्थित करत मीना जाधव म्हणतात, आमच्या घरात एवढ्या पगारात दिवाळी साजरी होऊ शकत नाही. आणि त्यामुळेच आमच्या 40 एसटी बांधवांनी संसार कसा चालवायचा या विवंचनेतून आत्महत्या केली. तुटपुंज्या पगारात संसार चालवणे जिथे अवघड आहे, तिथे दिवाळी कशी साजरी होणार? आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अशीच आहे. त्यामुळे, रस्त्यावर आल्याशिवाय आम्हाला पर्याय उरत नाही. सरकारने आमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून एसटी कर्मचाऱ्यांना शासनात सामावून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार द्यावा, अशी मागणी मीना जाधव कळकळीने करत आहेत.
हेही वाचा - तुरुंगात जा, पण संप मोडू नका; आजीबाईंचा एसटीच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा