सांगली - उद्या (शनिवार) सांगलीसह, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूर स्थितीबाबत लोकप्रतिनिधीची आढावा बैठक पार पडणार आहे. यावेळी गतवर्षीच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर गठीत करण्यात आलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावरही चर्चा पार पडणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न होणार आहे.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सांगलीमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडणार आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातल्या मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी आणि वडनेरे समितीचे सदस्य, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होणार आहे.
या बैठकीमध्ये संभाव्य पूरस्थितीचा आढावा त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रात गतवर्षी महापुराने हाहाकार माजवला होता. त्या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या वडनेरे समितीच्या तयार झालेल्या अहवालवरही चर्चा होणार आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीसाठी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार असून निमंत्रितांव्यतिरिक्त अन्य कोणालाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आवारात कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले आहे.