सांगली- कुरळपमधील आर्दली मळ्यातील वस्तीत अडीच फुटाची मगर सापडली. या मगरीला वनविभाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चांदोली नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. मगर अढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुरळपमध्ये मागील सहा महिन्यांपासून मगरींचा वावर वाढला आहे. परिसरात मोठ्या संख्येने लहान मुले व जनावरे असल्याने मगरींपासून धोका निर्माण झाला आहे. काल रात्री नऊ वाजता काही युवक ऐतवडे खुर्द रस्त्यावर फिरत होते. त्या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून दोन मगरी रस्त्यावर येत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर प्राणी मित्र अजय पाटील, जयदीप देवकर व युवकांनी काठीच्या साहाय्याने एक मगर पकडली. मात्र, दुसरी मगर शेतात निघून गेली.
युवकांनी मगरीला दोरीच्या साहाय्याने पकडून ठेवले. त्यादरम्यान वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनरक्षक आर.बी पाटोळे व त्यांच्या चमुने रात्री दहा वाजता घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मगरीला ताब्यात घेतले. त्यानंतर मगरीला चांदोली नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हेही वाचा- पालकमंत्री जयंत पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, जतमधील शेतकऱ्याशी साधला संवाद