सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. मुंबईवरून शिराळा तालुक्यातील अंतरी खुर्दमध्ये आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीची मुंबईतील रुग्णालयात कोरोना चाचणी झाली होती. त्याचा अहवाल आज मिळाला असून तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.
ही ४२ वर्षीय व्यक्ती १७ मे ला मुंबई येथून अंतरी खुर्द या आपली गावी पोहचली होती. या व्यक्तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच तिला मिरज येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच या व्यक्तीची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करुन खात्री करण्यात येणार आहे. या व्यक्तिच्या निकटवर्तीयांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.