सांगली - शहरातील एक ९४ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध महिला कोरोना मुक्त झाली आहे. या महिलेला मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, १४ दिवस सदर महिलेस खबरदारी म्हणून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. हा व्यक्ती सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा रुग्णालयातील कर्मचारी आहे. या व्यक्तीला कोरोना असल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर सांगली प्रशासनाकडून तातडीने त्याच्या संपर्कात आलेल्या कामेरी येथील नातेवाईक व इतर व्यक्तींचे विलगीकरण केले होते. २८ एप्रिल रोजी 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या नातेवाईकांपैकी एक ९४ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते. या वृद्ध महिलेवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते.
सोमवारी या महिलेस १४ दिवस पूर्ण झाल्याने महिलेची २ वेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. दोन्ही कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने वृद्ध महिलेला आज मिरज कोरोना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यावेळी कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, स्टाफ यांच्या उपस्थितीत वृद्ध महिलेला निरोप देण्यात आला. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या ही सध्या ११ इतकी आहे.