सांगली - वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावात एका भंगार व्यवसायिकाने केवळ 300 रुपयात भंगार कपाटाची खरेदी केली. पण, त्या कपाटात 7 तोळे सोन्याचे दागिने आढळले. त्यानंतर त्या भंगार व्यावसायिकाने प्रामाणिकपणे ते दागिने मूळ मालकाला परत केल्याने गावात सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
मूळचे आष्ट्याचे असलेले विक्रम दत्तू शिंदे हे आपल्या परिवारासह मागील दहा वर्षांपासून चिकुर्डे (ता.वाळवा) येथे भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी नेहमी प्रमाणे विक्रम हे चिकुर्डे गावात भंगार गोळा करण्यासाठी फिरत असताना उदय तेली यांनी घरातील स्वच्छतेसाठी खराब साहित्य घराबाहेर काढून टाकले होते. त्यापैकी जुनी पत्र्याचे शोकेस कपाट तेली यांनी अवघ्या 300 रुपयात विक्रम यांना विकले होते. कपाट घरी आणून फोडत असताना त्यातील कप्यामध्ये स्टीलचा डबा दिसून आला. विक्रम यांनी तो डबा उघडताच त्यात सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने दिसले. हे दागिने जवळपास ६ ते ७ तोळ्यांच्या दरम्यान होते. त्यानंतर विक्रम यांनी घरातील सर्वाना सांगून उदय तेली यांच्या घरी जाऊन सर्व दागिने त्यांच्या हाती सपूर्द केले.
भंगार गोळा करण्याचे काम करत असले तरी मनाची श्रीमंती मोठी असल्याचे त्यांनी समाजाला दाखवून दिले. सापडलेल्या दागिन्यांची मनात लालसा न बाळगता ते प्रामाणिकपणे परत केल्याने सर्व स्तरातून विक्रम शिंदे यांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - जतमध्ये सावकाराच्या त्रासास कंटाळून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या