सांगली : आधिकच्या नफ्याची आमिष देऊन 47 जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन ट्रेडींग ( Online trading) गुंतवणुकीच्या नावाखाली तीन कोटी 37 लाखांची ( Fraud of Rs 3.37 crore) फसवणूक केल्याचा हा प्रकार असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये समीर अख्तर हुसेन (Sameer Akhtar Hussain)याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज येथील तासगाव फाटा या ठिकाणी राहणाऱ्या समीर अख्तर हुसेन याने त्याच्या ओळखीतल्या काही व्यक्तींना ऑनलाइन ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा मिळतो असे सांगितले.सुमारे 12 ते 25 टक्के इतका नफा मिळण्याचे आमिष दाखवत सुमारे 47 जणांकडून 50 हजारांपासून दीड ते 2 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करायला लावली. यामध्ये सांगली,कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यातील विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील 47 जणांनी समीर हुसेन याच्याकडे पैसे गुंतवले.
काही दिवसांनंतर समीर हुसेनने नफा आणि पैसे देण्याबाबत टाळाटाळ सुरू केली .अनेकांनी समीर हुसेन याच्या घरावर धडक दिली, मात्र त्या ठिकाणी,तो राहत नसल्याचे समोर आले. तसेच तो कोणाचेही फोन उचलत नव्हता, तेव्हा फसवणूक झाल्याची बाब समोर आली. यामुळे 47 जणांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन समीर हुसेन याच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही पाहा- Solapur Crime News : सुलेमानी खड्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा