सांगली - एसटी बस पलटी होऊन 38 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना विटा गावाजवळ घडली आहे. येथील एका वळणावर हा अपघात झाला. अपघातामधील जखमी विद्यार्थ्यांवर विटा गावातील शासकीय रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सांगलीच्या विटा आगाराची बस भांबर्डे, देवनगर, सांगोलामार्गे वाळुजकडे निघाली होती. यावेळी आसपासच्या गावातील वाळूज येथील हायस्कूलला जाणारी सुमारे 50 ते 55 मुले या बसमधून प्रवास करीत होते. या बस मध्ये विद्यार्थी सोडून इतर एकही प्रवासी उपलब्ध नव्हता. ही बस देवनगर येथून पुढे सांगोला येथे जात होती. त्यावेळी विटा नजीक एसटी आला असता, समोरून आलेल्या टमटमला चुकवण्यासाठी बस चालकाने बस बाजुला घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र, रस्त्याच्या साईट पट्ट्यांचे खच्चीकरण झाल्याने एसटी बस जागीच पलटी झाली.
या अपघातात एसटीतून प्रवास करणाऱ्या 38 शाळकरी विद्यार्थ्यांसह चालक आणि वाहक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना विट्यातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.