सांगली - जत तालुक्यात पडलेल्या धुंवाधार पावसामुळे पूर्व भागातील नाले- ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. या ओढ्यामधून वाट काढत घरी परतणाऱ्या 3 शेतमजूर महिला वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या तिन्ही महिलांना वाचवण्यात यश आले आहे.
धुवांधार पाऊसामुळे नाले-ओढे तुडुंब..
जत तालुक्यातल्या पूर्व भागात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला आहे. मेंढेगिरी, देवनाळ, उंटवाडी, रावळगुंडवाडी अमृतवाडी आणि पाच्छापूर या ठिकाणी दमदार पाऊस झाला. पावसामुळे या ठिकाणी अनेक भागातील नाले-ओढे तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे पूर पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
ओढ्यातून वाहून जाणाऱ्या तिघी महिलांना वाचवण्यात यश..
पावसामुळे पाच्छापूर येथील ओढा देखील पावसामुळे तुडुंब भरून वाहत होता. दरम्यान गावाच्या पलीकडच्या वस्तीवरील काही महिला शेतमजुरीसाठी ओढ्याच्या पलिकडे सकाळी गेल्या होत्या आणि सायंकाळी काम आटोपून घरी परतण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असूनही 7 महिलांनी यातून वाट काढत जाण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने काही महिला माघारी गेल्या तर, तिघींनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. काही अंतर पाण्यातून पार केल्यावर ओढ्याच्या मध्य भागी पोहोचल्यानंतर पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तिन्ही महिला पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून गेल्या. हा सर्व प्रकार एका मोबाईलमध्ये चित्रीत केला गेला. दरम्यान या घटनेनंतर त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांनी वाहून जाणाऱ्या तिन्ही महिलांना दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढत त्यांचे जीव वाचवले आहेत.