सांगली - सांगली जिल्ह्यामध्ये कोव्हिड लसीकरण मोहीम उद्या शनिवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 26 हजार 500 शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असून त्याची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
लसीकरण मोहीम होणार सुरू
देशभरात उद्या शनिवारपासून कोळी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. प्रशासनाकडून याची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यातही शनिवारपासून कोव्हिड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेच्या तयारीची माहिती देत लसीकरण मोहिमेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे व जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
26 हजार 500 कर्मचाऱ्यांना देणार लस
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, की सीरम इन्स्टिट्यूटच्या 31 हजार 800 लसी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्याची योग्य खबरदारी घेण्यात येत आहे आणि शनिवारपासून जिल्ह्यातील 26 हजार 500 शासकीय, निमशासकीयआणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.त्यासाठी 9 केंद्र नियुक्त करण्यात आलेली आहेत,शहरी भागात पाच आणि ग्रामीण भागात चार अशा केंद्राच्या माध्यमातून लसीकरण मोहीम पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील या लसीकरण मोहिमेसाठी सर्व पातळ्यांवर खबरदारी घेण्यात आलेली आहे.
प्रशासन सज्ज
दररोज 100 इतक्याच लसी प्रत्येक केंद्रांवर देण्यात येणार आहेत. प्रशिक्षित कर्मचारी या लसीकरण मोहिमेची कामगिरी बजावणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येक व्यक्तीला लस दिल्यानंतर त्याचे अर्धा तास निरीक्षण होणार, यावेळी एखाद्या व्यक्तीस कोणताही त्रास झाल्यास पुढील उपचाराचीही व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.