सांगली - कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका बँक कर्मचाऱ्याला रविवारी सकाळी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर चिंताजनक प्रकृती असणाऱ्या कोरोना रुग्णाचा रात्री मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण जिल्हा आणि प्रशासन हादरून गेले आहे.
सांगली शहरातील विजयनगर येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीला रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. सदर व्यक्ती हा शहरातील एका बँकेत कर्मचारी होता. १४ एप्रिलपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचार सुरू होते. यानंतर १७ एप्रिल रोजी अचानक प्रकृती खालावल्याने शहरातील एका डॉक्टरकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये सदर व्यक्तीला न्यूमोनिया झाल्याचे समोर आले होते. यानंतर १७ एप्रिल रोजी प्रकृती आणखी खालावून कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना मिरजेतील कोरोना रुग्णालयात दाखल करत स्वॅब तपासणी करण्यात आली होती.
रविवारी सकाळी त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. संबंधित कोरोना व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांना तातडीने ताब्यात घेत स्वॅब तपासणीसाठी घेत आयसोलेशनमध्ये दाखल केले आहे. तसेच कोरोना व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबरोबर कोरोनाबाधित रुग्ण ज्या बॅंकेत कामाला होता, त्यामधील आणि कोरोना रुग्णाच्या संपर्कातील २७ जणांचा शोध घेऊन ताब्यात घेत त्यांना इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईनमध्ये दाखल केले आहे. तर, कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला आहे. यासाठी बँकेचे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेत शोध सुरू केला आहे.
दरम्यान, चिंताजनक प्रकृती बनलेल्या कोरोना रुग्णाचा रविवारी रात्री प्रकृती आणखी खालावून उपचार सुरू असताना मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, मागील महिन्याभरात सदर व्यक्ती यांनी बाहेर कुठेही प्रवास केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.