सांगली - जिल्ह्यात आज कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला. मुंबईच्या धारावीमधून सांगली जिल्ह्यात आलेल्या बारा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली. मिरजेच्या कोरोना रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील २० जण अवैधरीत्या दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या इस्लामपुरात दाखल झाले. याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने या सर्वांना ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात दाखल केले. या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी शुक्रवारी १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर ६ जणांचे अहवाल हे प्रतीक्षेत होते.
आज राहिलेले सहा अहवाल मिळाले असून यातील एका मुलीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. या मुलीला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.