रत्नागिरी - जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे. अशातच एका तरुणाने सोमवारी (दि. 12 जुलै) सायंकाळी एका तरुणाने जुन्या बाजारपुलावरून थेट वाशिष्ठी नदीत उडी मारली. तो वाहून जातो की काय, या भीतीने बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. त्यालाही पाण्याच्या वेगामुळे बाहेर पडताना नाकीदम आला. तरीही काहीवेळाने तो सुखरूप परतला. दरम्यान, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
... अन नदीपात्रात उडी मारली
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही कमालीची वाढ झाली आहे. चिपळूण शहरातील वाशिष्ठी, शिवनदीसह गावागावातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. चिपळूण शहरातील जुन्या बाजारपुलावरून पाणी जात असून नवीन पुलालाही पाणी लागत आहे. या दोन्ही पुलांवरून नदीचे पात्र बघताना भीती वाटत आहे. असे असताना एका तरूणाने सोमवारी जुन्या बाजारपुलावरून नदीपात्रात उडी मारली. हा प्रकार नव्या बाजारपुलावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्याने एकच गेंधळ उडाला. प्रत्येकजण त्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचवत होते. पण, काहीवेळाने तो नव्या पुलाखालून वेगाने वाहत गेला. त्याच्या पोहोण्यावरून तोही थकल्याचे दिसत होते. त्यामुळे अनेकांनी त्याची आशा सोडली होती. मात्र, त्याने स्वतःहून उडी मारल्याने त्याला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. एवढेच नव्हेतर याची माहिती कोणीही प्रशासनालाही दिली नाही. त्यानंतर मात्र, हा तरूण पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला आणि काहीवेळाने सुखरूप बाहेर आला. नागरिक चिडलेले पाहून तो तरूण काहीवेळात कपडे न घेताच पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
या तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ