रत्नागिरी - ठाणे येथून चालत खेड तालुक्यातील वरची हुंबरी या आपल्या गावी येणाऱ्या एका चाकरमान्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदाशिव भिकू कदम (वय 58) असे या चाकरमान्याचे नाव असून महाड तालुक्यातील विन्हेरे जंगलभागात त्यांचा मृत्यू झाला.
शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे त्याच ठिकाणी त्यांच्यावर विन्हेरे व वरची हुंबरी गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन सुरू होऊन दीड महिना उलटून गेला आहे. मुंबईत अनेकजण एकाच खोलीत राहतात. त्यात हाताला काम नाही, हाताशी असलेला पैसाही संपला. त्यामुळे जगायचे कसे या विवंचनेत असल्याने अनेकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. अगदी पायी प्रवास करत लोक गावी येत आहेत.
खेड तालुक्यातील सदाशिव कदम हे नोकरीनिमित्त ठाणे येथे वास्तव्यास होते. लॉकडाऊनमुळे ४ मे रोजी ते गावी येण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत पायी प्रवासाला निघाले. हे सर्वजण कशेडीनजीक आले असता पोलीस पकडतील या भीतीपोटी कदम यांनी मार्ग बदलला. विन्हेरे मार्गे जंगलमय भागातून जाण्याचा मार्ग पत्करत ते एकटेच जंगलातून प्रवास करत राहिले. ६ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी पत्नीशी संपर्क साधून सायंकाळपर्यंत घरी येतो असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल 'नॉट रिचेबल' लागत होता.
दरम्यान, विन्हेरे सुतारवाडी नजीकच्या जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलांना शनिवारी दुपारच्या दरम्यान त्यांचा मृतदेह दिसून आला. याबाबत महिलांनी स्थानिक पोलीस पाटील व सरपंच यांना कळविले. त्यांनी विन्हेरे मार्गावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून याबाबत कल्पना दिली. मृतदेह कुजलेल्या व प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. खिशातील ओळखपत्रावरून मृतदेहाची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले. वरची हुंबरीतील दहा ते बारा ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. मृतदेहाची अवस्था पाहून त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली असा परिवार आहे. घरी येण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.