रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील जैतापूर किंवा धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कायमस्वरूपी 108 रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी. या मागणीसाठी 250 हून अधिक महिलांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिंडी मोर्चा काढत आंदोलन केले. या भागातल्या 20 गावांमधील महिला या दिंडी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. टाळांच्या गजरात, हळूहळू चाला मुखाने 108 बोला, असा अभंग बोलत हे दिंडी आंदोलन करण्यात आले.
राजापूर तालुक्याच्या पश्चीमेकडील भागातील गावातील अपघातग्रस्त तसेच गंभीर रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी हलविण्यासाठी तात्काळ 108 रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. वेळेत काही जणांचे प्राणही गेले आहेत. त्यामुळे या भागासाठी जैतापूर किंवा धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शासनाकडून कायम स्वरूपी 108 रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात यावी. यासाठी त्रिवेणी संघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत 175 स्वयं सहायता बचतगटाच्या दोन हजारहून अधिक महिला सभासदांनी तीन महिन्यांपूर्वी प्रशासनला निवेदन देत विनंती केली होती. प्रसंगी रास्ता रोको करण्याचा इशाराही दिला होता. त्यावेळी महिलांच्या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला हेता. सोबतच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून मागणी केलेल्या ठिकाणी 108 रुग्णवाहिकेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविला होता. तसे पत्रही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त झाले होते. मात्र अद्यापही या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 108 रुग्णवाहिका उपलब्ध झालेली नाही.
तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून संघटित झालेल्या महिलांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिंडी मोर्चा काढत आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान या भागात कायमस्वरूपी रुग्णवाहिका मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरू असून वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. एन. बोलडे यांनी दिली आहे.