रत्नागिरी- महाविकास आघाडी सरकार राज्यात उत्तमरित्या काम करत आहे. हे सरकार पाच वर्षे स्थिर राहणार, हे ठामपणाने मी सांगतो, असे खासदार सुनील तटकरे दापोलीत म्हणाले.
१०५ जागा मिळवूनही सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपच्या नेत्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे मी समजू शकतो. परंतु, चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र, अलीकडे चंद्रकांत दादांना काय झाले, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. मात्र, हे सरकार स्थिर आहे, हे सरकार पाच वर्षे स्थिर राहील. मध्यवर्ती निवडणुकांची सुतराम शक्यता नाही. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र लढावे, हे अचानकच त्यांना सुचण्याचे कारण काय? आम्ही काय करावे हा निर्णय घेण्याचा अधिकार देशाचे नेते शरद पवार यांना आहे. तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला स्वतंत्र निवडणुका लढवायच्या आहेत का? का कसे करायचे ते तुम्हाला ठरवायचे आहे. तुम्हाला आता कुठलाही मित्रपक्ष उरला नाही, म्हणूनच तुम्ही अशा प्रकारची भाषा करता, अशी टीका तटकरे यांनी भाजपवर केली.
खडसे राष्ट्रवादीत येत असतील तर स्वागतच- सुनील तटकरे
भाजपला बहुजनांचा चेहरा करण्यासाठी दिवंगत प्रमोद महाजन आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात व उत्तर महाराष्ट्रात ३० ते ३५ वर्षे काम केले. मात्र, दीर्घकाळ एका राजकीय पक्षाची नीतिमुल्ये जपत योगदान देणाऱ्या नेतृत्वावर अन्याय होतो. तेव्हा स्वाभाविकपणे हे नेतृत्व कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचा विचार करत असते. खडसे यांच्यासारखा जुना जाणता अनुभवी नेता जर कुठल्या राजकीय पक्षात जात असेल, तर कुठलाही राजकीय पक्ष त्यांचे स्वागत करेल. आणि खडसे यांनी जर राष्ट्रवादीत येण्याचा विचार केला, तर मला स्वतःलाच त्याबाबतीत स्वागत करायला आवडेल, असेही तटकरे म्हणाले.
भाजपची भूमिका दुटप्पी
भाजप केंद्रात सत्तेवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे. केंद्रात एक भूमिका, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने इथे एक भूमिका, इथे दुटप्पी भूमिका, हे केवळ दुटप्पीपणाचे लक्षण असल्याचेही तटकरे म्हणाले.
हेही वाचा-'अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्क्यांनी शिथील'