रत्नागिरी - तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या भोंगळ कामाचा फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे. ठेकेदाराने अर्धवट ठेवलेला बंधारा खारलँडच्या अधिकाऱ्यांनी माती टाकून भरला. मात्र, पाणी जाण्यासाठी जागाच न ठेवल्याने शनिवारी रात्री कोसळलेल्या पावसाचे पाणी येथील ग्रामस्थांच्या थेट घरात शिरले. यात घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर देखील स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी फिरकले देखील नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
रहिवासी भागात पाणी
शनिवारी दुपारपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली. रात्रभर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वरवडे परिसरात देखील धुवांधार पाऊस कोसळला. वरवडे भंडारवाडी येथे रात्री 12 नंतर पाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली. पाण्याचा निचरा होण्यास जागाच नसल्याने पाणी रहिवासी भागात शिरण्यास सुरुवात झाली. मध्यरात्री 2 वाजता पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात शिरले. अचानक आलेल्या या संकटाने ग्रामस्थ पुरते भयभीत झाले. मध्यरात्री 2 वाजता शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी संपूर्ण रात्र येथील ग्रामस्थांनी जागून काढली. रात्री 2 वाजता जनावरे आणि माणसांना स्थलांतरित करावे लागले.
आंदोलन करणार असल्याचा इशारा
वरवडे भंडारवाडा येथील शंकर बोरकर आणि अन्य दोघांचे मोठे नुकसान झाले आहे. घराच्या मागच्या आणि पुढच्या पडवीत पाण्याचा शिरकाव झाला. यात घरातील लाद्या देखील निघाल्या. घरातील जिन्नस, पिकवलेले तांदूळ पूर्णतः भिजून गेले. घर आणि सामान यांचे प्रत्येकी लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांवर एव्हडे मोठे संकट कोसळल्या नंतर देखील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच रविवारी दुपारपर्यंत फिरकले देखील नव्हते. याबाबत ग्रामस्थांनी राग व्यक्त केला. खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भोंगळ कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत असून याविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी सरपंच निखिल बोरकर यांनी दिला आहे.
खाडीनजिकची अनधिकृत बांधकामे धोक्यात
खाडीनजिक काही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. ही बांधकामे धोक्यात आली आहेत. कुठल्याही क्षणी ही बांधकामे पुराच्या पाण्यामुळे ढासळू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.