रत्नागिरी- खेड येथील जगबुडी नदीने रात्री धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे जगबुडी पुलावरील वाहतूक रात्री साडे अकराच्या सुमारास बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता. मात्र, नदीची पाणीपातळी ओसरल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
जगबुडी नदीची पाणी पातळी ६.९० मीटर इतकी आहे. इशारा पातळी ६ मीटर असून धोक्याची पातळी ७ मीटर एवढी आहे. मात्र, रात्री मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. नदीची पाणीपातळी तब्बल ७.८ मीटर इतकी झाली होती. त्यामुळे पुलावरील वाहतुकीला साडे अकराच्या सुमारास बंद करण्यात आले होते. वाहतूक बंद झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे नऊ तास मुंबई-गोवा महामार्ग ठप्प होते. मात्र आता जगबुडी नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे आज सकाळी साडेआठच्या सुमारास पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.