रत्नागिरी - जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कळमणी गावात सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा पहायला मिळत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ पाण्यासाठी लढत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी नेहमी निराशाच आली आहे.
गावात १९८० साली नळपाणी योजना आली, मात्र त्या नळाला पाणी कधी आलेच नाही. आज ना उद्या पाणी येईल या आशेने नळासमोर भांड्यांची रांग मात्र वाढताना दिसून येते. पाणी नसल्याने गावातील शेती ओस पडली आहे. उष्णतेमुळे पाणी पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावात प्रत्येकाला पाणी देण्यासाठी प्रशासनसुद्धा हतबल आहे.
पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागत असून विहिरीत पाणी साठण्याची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे. पाऊस आणखी लांबला तर कळमणी गावाप्रमाणेच आणखी काही गावांचीही अशीच अवस्था होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.