रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईचे सावट गडद होताना पाहायला मिळत आहे. कारण गतआठवडयात ८२ गावांमधील १५१ वाड्यात पाणीटंचाई होती. आता या वाड्यांची संख्या ४४ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११० गावांमधील १९५ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या वाड्यांना प्रशासनाकडून २० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील खेड तालुक्यात सर्वाधिक २८ गावातील ४८ वाड्यांत पाणीटंचाई आहे. येथे १ शासकीय आणि ६ खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील १७ गावांतील ३१ वाड्यात पाणीटंचाई असून, एका शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लांजा तालुक्यात ७ गावांतील १४ वाड्यांत एक शासकीय व एक खासगी अशा दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दापोलीत २४ गावांतील ४३ वाड्या गुहागरात २ गावांतील ९ वाड्या आणि संगमेश्वरात १८ गावातील ३३ वाड्यांना टंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७ शासकीय आणि १३ खासगी अशा एकूण २० टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी २ जूनपर्यंत जिल्ह्यात ६७ गावातील १२२ वाड्या तहानलेल्या होत्या. त्यावेळी १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.
एकीकडे पाऊस लांबणीवर पडला आहे, त्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भूजल पातळीही खालावली आहे. जर पाऊस येत्या आठवडाभरात पडला नाही तर तहानलेल्या गावांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.